पर्यावरणासाठी एक सदिच्छा : वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचा संदेश
पर्यावरणासाठी एक सदिच्छा : वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि जलसंवर्धनाचा संदेश
लेवाजगत न्यूज भालोद : रावेर विधानसभा मतदारसंघातील रावेर व यावल तालुक्यांमध्ये अलीकडेच झालेल्या वादळामुळे अनेक शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला असून, पर्यावरण संवर्धन व जलसंधारणासाठी विशेष आवाहन केले आहे.
![]() |
| जाहिरात |
![]() |
| जाहिरात |
दरवर्षी १८ जून रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, होर्डिंग्ज, बॅनर्स आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र यावर्षी वाढदिवसानिमित्त होणारा खर्च टाळून प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावावा आणि आपल्या शेतात 'जलतारा' तयार करावा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी, हितचिंतक आणि मित्रपरिवाराला केले आहे.
'जलतारा' ही जलसंधारणाची साधी व प्रभावी पद्धत असून, सुमारे ५ फूट रुंद, ५ फूट लांब आणि ६ फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये मोठे दगड भरल्यास पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत मुरते. यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते तसेच विहिरी, बोअरवेल आणि जलसाठ्यांचे पुनर्भरण होते.
या उपक्रमांत सहभागी झालेल्या नागरिकांनी वृक्षारोपण किंवा जलतारा तयार केल्याचे जिओ-टॅग केलेले छायाचित्र 87884 20804 या क्रमांकावर पाठवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
"जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेले आपले योगदान हीच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान वाढदिवस भेट असेल," असे आमदार अमोल जावळे यांनी म्हटले आहे.
"एक वृक्ष आणि एक जलतारा... होईल वाढदिवस माझा साजरा!" हा संदेश देत त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या या लोकचळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत