भुसावळ - फैजपूर बससेवा आजपासून महिनाभरासाठी बंद; मार्ग बदलल्याने प्रवाशांना फटका
भुसावळ - फैजपूर बससेवा आजपासून महिनाभरासाठी बंद; मार्ग बदलल्याने प्रवाशांना फटका
लेवाजगत न्यूज | भुसावळ
भुसावळ ते फैजपूर मार्गावरील रस्त्याच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, १७ जून ते १६ जुलै या कालावधीत हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भुसावळ आणि फैजपूर दरम्यान धावणारी आमोदा,बामनोद, पाडळसा या मार्गे थेट एसटी बससेवा पुढील एक महिना बंद राहणार आहे. या निर्णयाचा परिणाम दररोज या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांवर होणार असून, त्यांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
![]() |
| जाहिरात |
![]() |
| जाहिरात |
मार्ग बंद असल्यामुळे भुसावळहून फैजपूरमार्गे सावदा, रावेर आणि बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस आता पर्यायी मार्गाने धावतील. या बसेस अकलूद फाटा – रिधूर – थोरगव्हाण – सावदा मार्गे प्रवास करतील. मार्ग बदलल्याने अंतरात वाढ झाली असून, प्रवासाचा कालावधी देखील वाढण्याची शक्यता आहे.
याचबरोबर प्रवाशांच्या खिशालाही याचा फटका बसणार आहे. मार्गातील बदलामुळे भुसावळ ते सावदा या प्रवासाचे भाडे वाढले असून, पूर्वी ४७ रुपये असलेले भाडे आता ५३ रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी ६ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, भुसावळहून फैजपूरकडे जाणाऱ्या कार, जीप आणि इतर हलक्या वाहनांसाठी प्रशासनाने अंजाळे – चिखली – भालोद – हिंगोणा हा पर्यायी मार्ग निश्चित केला आहे. या मार्गाद्वारे वाहने बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गाला जोडली जातील आणि पुढे फैजपूरकडे जाऊ शकतील. त्यामुळे या ग्रामीण रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता असून, वाहनचालकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच, ट्रक व इतर अवजड वाहनांची वाहतूक यावल मार्गे वळविण्यात आली आहे. रस्त्याच्या कामादरम्यान वाहतूक सुरळीत राहावी आणि अपघात टाळता यावेत यासाठी प्रशासनाने हे नियोजन केले आहे.
रस्त्याच्या कामामुळे तात्पुरता त्रास सहन करावा लागणार असला, तरी काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक अधिक सुरक्षित आणि वेगवान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत