साने गुरुजी स्मृती सप्ताहानिमित्त भुसावळात गुणगौरव यशोत्सव उत्साहात; विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
साने गुरुजी स्मृती सप्ताहानिमित्त भुसावळात गुणगौरव यशोत्सव उत्साहात; विद्यार्थी, शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
लेवाजगत न्यूज भुसावळ, दि. ७ जून : साने गुरुजी स्मृती सप्ताह तसेच कर्मयोगी वासुदेव गुरुजी स्मृतिदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला ‘गुणगौरव यशोत्सव – उत्सव गुणवत्तेचा’ हा पुरस्कार वितरण व सत्कार समारंभ रविवारी भुसावळ येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शिक्षण, सामाजिक कार्य, आरोग्य, उद्योग, साहित्य आणि विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करण्यात आला.
नंदनवन कॉलनी येथील डॉ. बी. व्ही. खाचणे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथराव खडसे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, आमदार अमोल जावळे, लोढा ग्रुपचे डेप्युटी सीईओ तुषार येवले, डॉ. पंकज पाटील, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, महेश फालक, पी. व्ही. पाटील, गणेश नेहते, ललित पाटील, सुहास चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माता शारदा, साने गुरुजी, श्री गजानन महाराज आणि कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रवेशद्वारावर उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. कु. नुपूर भालेराव यांनी सादर केलेल्या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रास्ताविकात शांताराम पाटील गुरुजी यांनी आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. वाचन संस्कृती जोपासण्याबरोबरच गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी वाचनालय सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेच्या यशस्वी वाटचालीत योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.
४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
साने गुरुजी स्मृती सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या ४५ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वतीने कु. गुंजन अत्तरदे यांनी मनोगत व्यक्त करत अशा सन्मानामुळे विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली.
संस्थांच्या कार्याचा गौरव
समाज आणि शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांना ‘कर्मयोगी वासुदेव गुरुजी संघटक गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. यामध्ये तळवेल येथील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ, खडका येथील स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ, सकल लेवा महिला मंडळ भुसावळ आणि लेवा प्रतिष्ठान भुसावळ यांचा समावेश होता.
शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
‘कर्मयोगी वासुदेव गुरुजी प्राध्यापक गौरव पुरस्कार’ प्रा. डॉ. सुनील मधुकर नेवे यांना प्रदान करण्यात आला. तर ‘उपप्राचार्य गौरव पुरस्कार’ प्रा. शैलेश रमेश राणे यांना देण्यात आला.
‘मुख्याध्यापक गौरव पुरस्कार’ जयंत रमेश चौधरी आणि डॉ. शिवचरण उज्जैनकर यांना प्रदान करण्यात आला. तसेच विविध शाळांमधील उपक्रमशील, गुणवंत आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षकांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
जीवन गौरव आणि युवा गौरव पुरस्कारांचे वितरण
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अरुण घनश्याम पाटील यांना ‘जीवन गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या उभारणीत त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
‘युवा गौरव पुरस्कार’ तुषार सुधाकर येवले, वैभव किशोर ढाके, विनायक शंकर पाचपांडे, डॉ. लोकेश नेहते आणि सतीश घनश्याम महाजन यांना प्रदान करण्यात आला. समाजहित, उद्योग, आरोग्य आणि जनसेवा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रेरणादायी मनोगते
यावेळी बोलताना तुषार येवले यांनी जीवनातील यशामध्ये चांगल्या मित्रांचे आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत आजच्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या स्मृती जपण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व विशद केले. समाजात सकारात्मक विचार आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतींना उजाळा देताना ते भावूक झाले.
वासुदेव गुरुजींच्या कार्याचा खडसे यांनी केला गौरव
अध्यक्षीय भाषणात आमदार एकनाथराव खडसे यांनी कर्मयोगी वासुदेव गुरुजी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव केला. त्यांनी ज्या-ज्या ठिकाणी सेवा दिली त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या कार्यातून अनेक विद्यार्थ्यांना दिशा मिळाली असून समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोलाचे असल्याचे खडसे यांनी सांगितले.
तसेच आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशाच समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आकर्षक नियोजनाने वेधले लक्ष
कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध व्यवस्था, आकर्षक रांगोळ्या, माहितीपर भित्तीपत्रके आणि उपस्थितांसाठी करण्यात आलेली स्वागत व्यवस्था यामुळे कार्यक्रमाला वेगळीच शोभा प्राप्त झाली. उपस्थितांची नोंद घेऊन प्रत्येकाला वाचनालयाचा लोगो असलेला बॅच देण्यात आला. कार्यक्रमानंतर प्रत्येकाला ‘हितगुज’ पुस्तक आणि ‘गोदावरी’ साप्ताहिकाची प्रत भेट स्वरूपात देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा लोखंडे, अशा पाटील आणि येवले यांनी केले. शैलेंद्र महाजन यांनी आभार प्रदर्शन केले. स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमोद सरोदे, अजय वाघोदे, सतीश ढाके, उदय बोंडे, अनिल फेगडे, पंकज अत्तरदे, अजय पाटील आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत