फैजपूरकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेची रात्रभर धडपड; ७ एअर व्हॉल्व्ह बदलले
फैजपूरकरांच्या पाणीपुरवठ्यासाठी पालिकेची रात्रभर धडपड; ७ एअर व्हॉल्व्ह बदलले
कमी दाब आणि गळतीच्या समस्येवर उपाययोजना; वीजपुरवठा खंडित असतानाही काम पूर्ण
लेवाजगत न्यूज | फैजपूर
अलीकडे झालेल्या वादळी वाऱ्यामुळे लोहारा येथील पंपिंग केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने फैजपूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या परिस्थितीचा विचार करून फैजपूर नगरपालिकेने तातडीने पावले उचलत पाणीपुरवठा यंत्रणेतील महत्त्वाचे असलेले सात एअर व्हॉल्व्ह बदलण्याचे काम हाती घेतले.
नगराध्यक्षा दामिनी सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी फैजपूर ते खिरोदा मार्गावरील बंद व गळतीग्रस्त एअर व्हॉल्व्हची पाहणी करून त्याठिकाणी नवीन व्हॉल्व्ह बसविण्याचे काम युद्धपातळीवर केले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या मोहिमेत सातही व्हॉल्व्ह यशस्वीपणे बदलण्यात आले.
लोहारा जॅकवेलवरील वीजपुरवठा बंद असल्याने पाणीपुरवठा तात्पुरता थांबलेला असताना ही संधी साधून यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे भविष्यात होणारी गळती कमी होण्यास तसेच पाण्याचा दाब सुधारण्यास मदत होणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.
या कामादरम्यान उपनगराध्यक्षा निकिता कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदू कोळी, नगरसेवक सूरज गाजरे, सागर होले, पवन सराफ, राहुल गुजराथी आणि युनूस मोमीन यांनी उपस्थित राहून कामाची पाहणी केली. तसेच पालिकेचे कर्मचारी नदीम खान, अमोल सराफ, किशोर वडर, अमोल जावळे, जयेश सोनार, तुषार पाटील आणि चंदू कुऱ्हाडे यांनी रात्रभर मेहनत घेत काम पूर्ण केले.
लोहारा-खिरोदा मार्गावरील उर्वरित व्हॉल्व्हही बदलणार
पालिकेकडून आता खिरोदा ते लोहारा मार्गावरील बंद अवस्थेतील इतर एअर व्हॉल्व्ह बदलण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामामुळे पाईपलाईनमधील अडकलेली हवा बाहेर पडण्यास मदत होईल आणि पाण्याचा प्रवाह अधिक सुरळीत व वेगवान होईल. परिणामी शहरातील नागरिकांना अधिक प्रभावी आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा दामिनी सराफ यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत