सावद्यात भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
सावद्यात भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू, पाच जण जखमी
लेवा जगत न्यूज | सावदा-
सावदा शहराजवळील सोनाली कोल्ड्रिंक परिसरात रविवारी (१४ जून) सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर रस्त्यालगत उभ्या असलेल्या नागरिकांनाही धडक दिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव येथील सरफराज समशेर तडवी हा आपल्या कारने वाघोदा बुद्रुककडून सावद्याकडे येत होता. यावेळी त्याच्या वाहनाने समोरून जाणाऱ्या स्प्लेंडर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील प्रवासी गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर कारवरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही नागरिकांवर जाऊन आदळले. यात मोरगाव बुद्रुक येथील आत्माराम बाबुराव ढिवरे (वय ५३) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मंदाबाई ढिवरे, मुलगा मनोहर ढिवरे तसेच दुचाकीवरील काही जण जखमी झाले आहेत. जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच सावदा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी मनोहर आत्माराम ढिवरे यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास सावदा पोलीस करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत