पत्नी व दोन मुलांना विष देऊन शिक्षकाची आत्महत्या; शेअर बाजारातील कोट्यवधींच्या तोट्याची चर्चा
पत्नी व दोन मुलांना विष देऊन शिक्षकाची आत्महत्या; शेअर बाजारातील कोट्यवधींच्या तोट्याची चर्चा
शेअर व्यवहारातील आर्थिक फटका
लेवा जगत न्यूज | वाशी-धाराशिव प्रतिनिधी-
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. शेअर बाजारातील मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे मानसिक तणावात असलेल्या एका शिक्षकाने पत्नी व दोन चिमुकल्या मुलांसह जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चौगाव येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक योगेश पाटील हे काही दिवसांपासून आर्थिक अडचणींना सामोरे जात होते. शेअर बाजारातील व्यवहारांमध्ये त्यांना मोठा तोटा सहन करावा लागल्याने ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी रात्री कुटुंबीयांनी एकत्र जेवण केल्यानंतर पत्नी आणि मुलांना विषारी पदार्थ दिल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर स्वतःही त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी सकाळी घरातून कोणतीही हालचाल दिसत नसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. दरवाजा उघडून पाहिल्यानंतर घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
तपासादरम्यान घटनास्थळावरून एक सविस्तर हस्तलिखित पत्रही जप्त करण्यात आले असल्याचे समजते. त्या पत्रात आर्थिक नुकसानीमुळे निर्माण झालेली निराशा, वाढलेला मानसिक ताण आणि कुटुंबाच्या भवितव्याबाबतची चिंता व्यक्त करण्यात आल्याची चर्चा आहे. पोलिस या पत्राची पडताळणी करत असून सर्व बाबींचा सखोल तपास सुरू आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मृत शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी चांगली ओळख निर्माण केली होती. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर गावासह शैक्षणिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, मृतदेहांचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. एका कुटुंबाचा झालेला हा दुर्दैवी अंत सर्वांनाच सुन्न करून गेला असून आर्थिक तणाव आणि मानसिक आरोग्य या विषयांवर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत