Contact Banner

वादळग्रस्त शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन; पीक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत द्या – रक्षा खडसे

 

storm-affected-farmers-report-crop-loss-within-72-hours-raksha-khadse-appeal

वादळग्रस्त शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन; पीक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत द्या – रक्षा खडसे

*वादळग्रस्त शेतकऱ्यांना महत्त्वाचे आवाहन; पीक नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत द्या – रक्षा खडसे >>* https://www.lewajagat.com/2026/06/storm-affected-farmers-report-crop-loss-within-72-hours-raksha-khadse-appeal.html


लेवाजगत न्यूज सावदा -दि. २ जून :-
रावेर लोकसभा क्षेत्रासह जळगाव जिल्ह्यात आणि राज्यातील विविध भागांमध्ये १ जून रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यांमुळे व अवकाळी पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी, मका, कापूस, भाजीपाला तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा क्षेत्रातील खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रधानमंत्री फळ पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना तातडीचे आवाहन केले आहे. नुकसानीची माहिती विमा कंपनीकडे ७२ तासांच्या आत नोंदविणे आवश्यक असून, वेळेत तक्रार दाखल केल्यास नुकसान भरपाई मिळविण्याची प्रक्रिया सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देताना शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचे छायाचित्र, शेताचा तपशील आणि विमा संबंधित माहिती तयार ठेवावी. शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची नोंद निर्धारित कालावधीत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्यथा विमा दाव्याच्या प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात.

शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पीक विमा योजनेअंतर्गत तक्रार नोंदविण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी अधिकृत टोल-फ्री क्रमांक १४४४७ वर संपर्क साधावा किंवा PMFBY व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक ७०६५५१४४४७ वर माहिती पाठवून तक्रार नोंदवावी. याशिवाय संबंधित विमा कंपनी, कृषी सहाय्यक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी कार्यालयामार्फतही नुकसानाची माहिती सादर करता येणार आहे.

रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांना कोणताही विलंब न करता नुकसानाची माहिती तातडीने नोंदविण्याचे आवाहन केले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला विमा योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रशासन आणि कृषी विभाग आवश्यक ती मदत करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांत वादळामुळे पडझड, पिकांची नासाडी आणि शेतीमालाचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अहवाल समोर येत असून, महसूल व कृषी विभागाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे पीक विमा उतरविलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपला हक्काचा विमा लाभ मिळविण्यासाठी निर्धारित ७२ तासांच्या आत नुकसानाची माहिती नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.