सुरतमध्ये भीषण अपघात; दोन एसटी बस आणि टँकरच्या धडकेत ७ जणांचा होरपळून मृत्यू, ३८ जखमी
सुरतमध्ये भीषण अपघात; दोन एसटी बस आणि टँकरच्या धडकेत ७ जणांचा होरपळून मृत्यू, ३८ जखमी
बारडोली (लेवाजगत न्यूज सुरत) : गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात उवा गावाजवळ मंगळवारी दुपारी अत्यंत भीषण अपघात घडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बस आणि पाण्याच्या टँकरचा समावेश असलेल्या या दुर्घटनेत किमान ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून ३८ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर बारडोली व परिसरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, सुरतहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६ वरून प्रवास करत होती. त्यावेळी समोर असलेल्या पाण्याच्या टँकरला बसची जोरदार धडक बसली. धडकेनंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या दुभाजकावर आदळून समोरच्या मार्गावर गेली.
याच वेळी समोरून जामनेर -जळगाव-सुरत एसटी बस येत होती. नियंत्रण सुटलेल्या धुळे-सुरत बसने या बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की धुळे-सुरत बस दोन वेळा उलटली आणि काही क्षणांतच बसने पेट घेतला.
प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही
अपघातानंतर बसमध्ये लागलेल्या आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले. आगीचा वेग इतका प्रचंड होता की बसमधील अनेक प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तसेच घटनास्थळी उपस्थित नागरिकांनाही बचावकार्य करणे अवघड झाले. परिणामी बसमधील ७ प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गॅस कटरने काढावे लागले मृतदेह
अपघाताची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा पथके घटनास्थळी दाखल झाली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आणि जळालेल्या मृतदेहांपर्यंत पोहोचण्यासाठी बचाव पथकाला गॅस कटरचा वापर करावा लागला. अपघातात दोन्ही बस आणि टँकरचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची माहिती
सुरत ग्रामीणचे पोलीस महानिरीक्षक प्रेमवीर सिंग यांनी सांगितले की, राष्ट्रीय महामार्ग ५६ वर बारडोली-व्यारा मार्गावर हा अपघात घडला. एका बसने मागून पाण्याच्या टँकरला धडक दिल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसवर आदळली. या धडकेनंतर एका बसला आग लागली. मृतांचा आकडा सात असून ३८ जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे.
पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त
या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर शोकसंदेश देत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.
पंतप्रधानांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर केली असून प्रशासनाला बचाव आणि मदतकार्य तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत