Contact Banner

जिल्हा परिषद शिक्षक समाधान जाधव यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

zilla-parishad-teacher-samadhan-jadhav-receives-maharashtra-state-ideal-teacher-award


जिल्हा परिषद शिक्षक समाधान जाधव यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

भुसावळ (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशन, दापोली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा महाराष्ट्र राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५-२६ हा मानाचा पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील काहुरखेडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक समाधान रामचंद्र जाधव यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे, संपूर्ण जळगाव जिल्ह्यातून या पुरस्कारासाठी निवड होणारे ते एकमेव प्राथमिक शिक्षक ठरले आहेत.


zilla-parishad-teacher-samadhan-jadhav-receives-maharashtra-state-ideal-teacher-award


रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनच्या नियमावलीनुसार राज्यभरातील शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थीकेंद्रित कार्याचे सखोल मूल्यमापन करून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते. यंदाच्या निवड प्रक्रियेत समाधान जाधव यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांची राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

हा प्रतिष्ठेचा पुरस्कार आमदार सत्यजित तांबे यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रिजनल टीचर्स ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय काशीद, महाराष्ट्र राज्य सल्लागार प्रदीप सोनवणे, जळगाव जिल्हाध्यक्ष गोविंद चौधरी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

समाधान जाधव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा वापर, विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आवड निर्माण करणे, शालेय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविणे तसेच सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्रात सातत्याने कार्य करणे यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सन्मानामुळे काहुरखेडे गाव, भुसावळ तालुका आणि जळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाधान जाधव यांच्या यशाबद्दल शिक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आणि विविध सामाजिक संघटनांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.