Contact Banner

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यायचा? शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक नोंदणी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 

agristack-registration-appeal-for-punyashlok-ahilyadevi-holkar-farmer-loan-waiver-scheme-jalgaon

कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यायचा? शेतकऱ्यांनी तातडीने अॅग्रीस्टॅक नोंदणी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव | प्रतिनिधी :
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ चा लाभ मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी केलेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक महेशकुमार गायकवाड यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार ही योजना जाहीर केली असून, १५ जुलै २०२६ रोजीच्या पूरक शासन पत्राद्वारे योजनेतील काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि विकास संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर पीक कर्ज वितरित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६३,५११ सभासदांची ६३,५११ कर्जखाती तसेच राष्ट्रीयकृत बँकांची २६,६१४ कर्जखाती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत.






योजनेच्या पहिल्या टप्प्यात पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादीतील शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांकासह आपले सरकार सेवा केंद्र किंवा सेतू कार्यालयात आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम संबंधित बँक खात्यात जमा करण्यात येईल.

ज्या शेतकऱ्यांची अॅग्रीस्टॅक नोंदणी झालेली नाही, त्यांनी ती तातडीने करून घ्यावी. तसेच कर्ज खाते आधारशी जोडलेले नसल्यास तेही तत्काळ लिंक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पात्र लाभार्थ्यांच्या याद्या गावातील तलाठी, ग्रामसेवक, संस्थेचे सचिव तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

शेतकऱ्यांच्या माहितीमध्ये किंवा मंजूर रकमेबाबत काही विसंगती आढळल्यास ती पडताळणी केंद्रावर पोर्टलवर नोंदविणे आवश्यक आहे. विसंगती दूर झाल्यानंतरच कर्जमुक्तीची रक्कम संबंधित कर्ज खात्यात जमा होईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.