जमिनीच्या वादातून काकाचा खून; अपघाताचा बनाव उधळला, पुतण्याला काही तासांत अटक
जमिनीच्या वादातून काकाचा खून; अपघाताचा बनाव उधळला, पुतण्याला काही तासांत अटक
रावेर लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने काकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुनानंतर हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह नाल्याच्या कडेला टाकण्यात आला होता. मात्र, रावेर पोलिसांनी तांत्रिक व वैज्ञानिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावत आरोपी पुतण्याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा थावरू बारेला (वय ४६, रा. गारखेडा) यांचा मृतदेह २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत संशयास्पद अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच रावेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत आढळल्याने संशय बळावला आणि याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिकांकडून मिळालेली माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे तपासाची दिशा निश्चित करण्यात आली.
तपासादरम्यान मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९, रा. गारखेडा) याच्यासोबत जमिनीच्या कारणावरून सातत्याने वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. याच रागातून २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात रामा बारेला यांचा जागीच मृत्यू झाला.
गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतर ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकला, जेणेकरून हा अपघाती मृत्यू असल्याचा भास निर्माण होईल. मात्र, पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे हा बनाव फार काळ टिकू शकला नाही.
रावेर पोलिसांनी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक केली असून प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन हे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत