Contact Banner

मुसळधार पावसात पेटती चिता पुरात वाहून गेली; सुरक्षित स्मशानभूमीच्या अभावाने ढोरोशीत हृदयद्रावक घटना

 

burning-pyre-swept-away-in-flood-at-dhoroshi-village-demand-for-safe-cremation-ground

मुसळधार पावसात पेटती चिता पुरात वाहून गेली; सुरक्षित स्मशानभूमीच्या अभावाने ढोरोशीत हृदयद्रावक घटना


वृत्तसंस्था कराड : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढोरोशी गावात सुरक्षित स्मशानभूमीच्या अभावामुळे अत्यंत वेदनादायी घटना घडली. गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव मारुती मुळीक यांच्या अंत्यसंस्कारादरम्यान अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढ्याला आलेल्या पुरात पेटती चिता आणि मृतदेह वाहून गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माहितीनुसार, नातेवाईकांच्या उपस्थितीत ओढ्यालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार सुरू होते. मुखाग्नी दिल्यानंतर काही वेळातच मुसळधार पावसाने ओढ्याचे पाणी वेगाने वाढले. त्यामुळे चितेवरील लाकडे आणि अर्धवट जळालेला मृतदेह पुराच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेमुळे कुटुंबीयांसह ग्रामस्थांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.






घटनेनंतर धार्मिक विधींबाबतही अडचण निर्माण झाली आहे. तिसऱ्या दिवशी होणाऱ्या रक्षा विसर्जनासाठी आवश्यक अस्थी उपलब्ध नसल्याने कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत असून पुढील विधी कसे पार पाडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात सुरक्षित आणि सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वी अनेक वेळा निधीची मागणी केली होती. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधा योजनेअंतर्गत प्रस्तावही सादर करण्यात आले होते. मात्र प्रशासकीय स्तरावर निर्णय न झाल्याने हा प्रश्न कायम राहिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी नव्याने प्रस्ताव सादर केला असून आगामी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देऊन तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये, यासाठी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.