गारबर्डी धरण ओव्हरफ्लो; सावदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
गारबर्डी धरण ओव्हरफ्लो; सावदा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
सातपुडा पर्वतरांगांमध्ये झालेल्या दमदार पावसामुळे सावदा परिसरातील गारबर्डी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, खरीप तसेच आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता राहण्याची आशा बळावली आहे.
।
गारबर्डी धरणाचा लाभ लोहारा, उटखेडा, चिनावल, वाघोदा, कोचूर, रोझोदा, खिरोदा, सावखेडा आणि आसपासच्या गावांतील शेतकऱ्यांना होतो. धरणातील पाण्यामुळे सुकी नदीला प्रवाह मिळतो. परिणामी परिसरातील विहिरी, बोअरवेल आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होते.
यंदा पावसाबाबत सुरुवातीला अनिश्चितता असली तरी अलीकडील मुसळधार पावसामुळे धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढला. धरण भरल्याने सिंचनासाठी आवश्यक पाणीसाठा उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शेतकऱ्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, धरणातील पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून सिंचनासाठी वेळेवर पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच धरण परिसरात पर्यटनासाठी किंवा पाणी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
गारबर्डी धरण ओसंडून वाहू लागल्याने सावदा ग्रामीण भागातील शेतीला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून, भूजल पुनर्भरणालाही याचा मोठा फायदा होणार आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत