चाळीसगाव येथे वारकऱ्यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे मोफत सेवा शिबिर तीन दिंड्यांतील शेकडो वारकऱ्यांना सेवाभावातून आरोग्याचा उपचार
चाळीसगाव येथे वारकऱ्यांसाठी डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे मोफत सेवा शिबिर
तीन दिंड्यांतील शेकडो वारकऱ्यांना सेवाभावातून आरोग्याचा उपचार
चाळीसगाव | प्रतिनिधी
आषाढी वारीच्या पवित्र सोहळ्यात विठ्ठलनामाचा अखंड गजर करत पंढरपूरकडे पायी मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, जळगाव यांच्या वतीने चाळीसगाव येथे मोफत फिजिओथेरपी सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले. सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि समर्पणाची प्रचिती देणाऱ्या या उपक्रमात तीन प्रमुख दिंड्यांतील शेकडो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा देण्यात आली.
आषाढी वारीसाठी दरवर्षी हजारो वारकरी अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करतात. या प्रदीर्घ प्रवासामुळे मान, पाठ, कंबर, गुडघे, पाय तसेच सांध्यांमध्ये वेदना, स्नायूंमध्ये ताण आणि शारीरिक थकवा जाणवणे ही सामान्य बाब असते. ही गरज लक्षात घेऊन महाविद्यालयाच्या तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टांच्या पथकाने वारकऱ्यांसाठी विशेष सेवा शिबिर आयोजित केले.
शिबिरात वारकऱ्यांच्या विविध शारीरिक तक्रारींचे सखोल मूल्यमापन करून आवश्यकतेनुसार फिजिओथेरपी उपचार करण्यात आले. तसेच स्नायू व सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंगचे व्यायाम, स्नायू बळकट करणारे व्यायाम, योग्य शरीरस्थिती राखण्याबाबत मार्गदर्शन आणि पुढील प्रवास अधिक आरामदायी होण्यासाठी आवश्यक आरोग्यविषयक सल्लाही देण्यात आला. उपचारानंतर अनेक वारकऱ्यांनी वेदना कमी झाल्याचे सांगत डॉक्टरांच्या सेवाभावी कार्याचे मनापासून कौतुक केले.
या सेवा शिबिराचे समन्वयक म्हणून डॉ. मनोज सूर्यवंशी यांनी नियोजनापासून अंमलबजावणीपर्यंत संपूर्ण जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली डॉ. उत्कर्ष भोळे, डॉ. सलोनी किर, डॉ. नयन शेटे आणि डॉ. सृष्टी तभाणे यांनी दिवसभर समर्पित भावनेने वारकऱ्यांची सेवा केली. प्रत्येक वारकऱ्याला आवश्यक ते उपचार, मार्गदर्शन आणि आरोग्यविषयक सल्ला मिळावा यासाठी संपूर्ण पथकाने अविरत परिश्रम घेतले.
वारकरी संप्रदायाच्या सेवेला आरोग्यसेवेची जोड देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला असून, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यात या शिबिराला मोठे यश मिळाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत