फैजपूरकरांकडून सिंधूताई सपकाळ निराधार आश्रमाला ₹१.२५ लाखांची आर्थिक मदत
फैजपूरकरांकडून सिंधूताई सपकाळ निराधार आश्रमाला ₹१.२५ लाखांची आर्थिक मदत
सातपुडा व लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थांसह समाजसेवक जितेंद्र इंगळे यांचा सामाजिक उपक्रम; भविष्यातही सहकार्याचे आश्वासन
लेवाजगत न्युज फैजपूर :-
निराधार, अनाथ आणि वंचित बालकांच्या संगोपनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या कार्याला हातभार म्हणून फैजपूर येथील सातपुडा सहकारी पतसंस्था आणि लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने एक लाख रुपयांची, तर समाजसेवक जितेंद्र इंगळे यांनी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. एकूण ₹१ लाख २५ हजारांचा धनादेश सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे यांनी शिरूर (पुणे) येथील आश्रमात जाऊन सुपूर्द केला.
सिंधूताई सपकाळ यांचे बालपण फैजपूर येथे गेल्याने शहराशी त्यांचे भावनिक नाते आहे. याच जिव्हाळ्याच्या नात्यामुळे फैजपूरकरांकडून त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सातत्याने आर्थिक सहकार्य केले जात असून, भविष्यातही हे सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही नरेंद्र नारखेडे यांनी दिली.
यावेळी नरेंद्र नारखेडे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर येथील आश्रमाला भेट देऊन तेथील बालकांशी संवाद साधला. आश्रमाचे प्रतिनिधी विनय सपकाळ यांनी सुरू असलेल्या बांधकामाची माहिती देत निधीची गरज, प्रकल्पासमोरील अडचणी आणि आगामी नियोजन याबाबत सविस्तर माहिती दिली.
या भेटीदरम्यान सिव्हिल अभियंता भरत महाजन, अतुल तळेले, संजोग होले, हरीश अत्तरदे, धवल तळेले, आश्रम सेवक विनय सपकाळ तसेच ममता सपकाळ यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. लोकसहभाग आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे आश्रमाचे बांधकाम लवकरच पूर्णत्वास जाईल, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.
या देणगी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सातपुडा सहकारी पतसंस्था आणि लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संचालक मंडळाचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत