डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात गुरुपौर्णिमा भक्तिभावाने साजरी
जळगाव | प्रतिनिधी
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे गुरुपौर्णिमा भक्तिभाव, उत्साह आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी माजी खासदार तथा गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांना पुष्पगुच्छ अर्पण करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गुरुपूजनाने झाली. आर्या आणि अरमान यांनी सूत्रसंचालन करत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. त्यानंतर दिया, ऐश्वर्या आणि देवराज यांनी गुरुंच्या मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करणारे मनोगत व्यक्त केले. मधुरा आणि आशिष यांनी गुरुमहिमेवर आधारित हृदयस्पर्शी कविता सादर केली, तर भावेश यांनी गुरुस्तवन गीत सादर करून वातावरण भक्तिमय केले. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी वक्त्यांनी गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, संस्कारांचा पाया आणि यशस्वी जीवनाची प्रेरणा असल्याचे सांगत गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या मार्गदर्शनामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो आणि समाजसेवेची प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांनी गुरुजनांचा सन्मान करत ज्ञान, सेवा आणि संस्कारांची परंपरा जपण्याचा संकल्प केला.
शेवटी उत्कर्ष भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता उत्साहपूर्ण वातावरणात झाली.
यावेळी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे "ज्ञान • सेवा • संस्कार • समर्पण" या मूल्यांचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण वैद्यकीय शिक्षणासोबत सामाजिक बांधिलकी, नैतिक मूल्ये आणि मानवी संवेदनशीलता रुजविण्यास सातत्याने प्रयत्नशील असल्याचे अधोरेखित करण्यात आले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत