Contact Banner

माजी सैनिकाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत १० लाखांची ऑनलाइन फसवणूक

 

ex-serviceman-digitally-arrested-scammed-of-rs10-lakh-in-jalgaon

माजी सैनिकाला 'डिजिटल अरेस्ट'ची भीती दाखवत १० लाखांची ऑनलाइन फसवणूक






जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नाव आल्याचे तसेच बँक खात्यात २ कोटी रुपये जमा झाल्याची खोटी भीती दाखवून ७० वर्षीय माजी सैनिकाची तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथील रहिवासी दामोदर राजधर चौधरी (वय ७०) यांना २५ फेब्रुवारी २०२६ रोजी व्हॉट्सअॅपवरून एका व्यक्तीचा कॉल आला. त्याने स्वतःला दिल्लीतील टेलिकम्युनिकेशन विभागातील पोलिस अधिकारी असल्याचे सांगत, त्यांच्या नावाचा गैरवापर करून मुंबईतील कुलाबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.

तसेच जेट एअरवेजशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांच्या नावाने २ कोटी रुपये बँक खात्यात जमा झाल्याचा बनाव रचत अटकेची भीती दाखवण्यात आली. संशयिताने वारंवार व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून न्यायालयीन कामकाजाचा देखावा उभा करत स्वतःकडे न्यायाधीश व पोलिस अधिकारी असल्याचा आभास निर्माण केला. त्यामुळे चौधरी यांच्यावर मानसिक दबाव निर्माण करण्यात आला.

याचदरम्यान संशयिताने त्यांच्याकडून बँक पासबुक आणि एटीएम कार्डचे फोटो मागवून घेतले. "प्रकरणातून निर्दोष सुटायचे असेल तर पैसे भरावे लागतील," असे सांगत सातत्याने तगादा लावला. अटकेच्या भीतीने घाबरलेल्या चौधरी यांनी १६ मार्च २०२६ रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरणगाव फॅक्टरी शाखेतील खात्यातून आरटीजीएसद्वारे १० लाख रुपये संशयिताने दिलेल्या खात्यावर वर्ग केले.

फसवणुकीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली असून, पुढील तपास सुरू आहे.

सायबर पोलिसांचे आवाहन :
कोणताही पोलिस अधिकारी, सीबीआय किंवा दूरसंचार विभागाचा अधिकारी फोन अथवा व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे अटकेची भीती दाखवून पैशांची मागणी करत नाही. अशा प्रकारचे कॉल आल्यास घाबरू नये आणि त्वरित जवळच्या पोलिस ठाण्याशी किंवा सायबर हेल्पलाइन १९३० वर संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.