प्रथम-द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता महाविद्यालय स्तरावर
प्रथम-द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता महाविद्यालय स्तरावर
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी — कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून प्रथम व द्वितीय वर्ष कला, वाणिज्य आणि विज्ञान (सीबीसीएस) अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर २०२६ तसेच त्यानंतर होणाऱ्या या परीक्षा संबंधित महाविद्यालयांमध्येच विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पडतील. परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या २२ मे २०२६ रोजी झालेल्या बैठकीत तसेच ९ जून २०२६ रोजीच्या विद्या परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील यांनी संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यताप्राप्त संस्थांच्या संचालकांना नियमावली आणि कार्यपद्धतीचे परिपत्रक जारी केले आहे.
या निर्णयामुळे हजारो विद्यार्थ्यांना स्वतःच्या महाविद्यालयात परीक्षा देता येणार असून, परीक्षा व्यवस्थापन अधिक सुलभ होण्याबरोबरच विद्यापीठावरील प्रशासकीय ताणही कमी होणार आहे. परीक्षा आयोजनासाठीचा खर्च विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कातून महाविद्यालयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने परीक्षा समन्वयक नियुक्त करणे बंधनकारक राहील. सीबीसीएस आणि एनईपी अभ्यासक्रमांच्या परीक्षा एकत्रित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील. प्रत्येक विषयासाठी किमान तीन प्रश्नसंच आणि त्यांची आदर्श उत्तरे तयार करावी लागतील. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकाला संबंधित विषयाचा किमान पाच वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आवश्यक असेल. वरिष्ठ पर्यवेक्षक परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधी प्रश्नसंचाची निवड करतील, तर प्रत्येक पेपरचे मूल्यांकन सात दिवसांच्या आत पूर्ण करून गुण एमकेसीएलच्या पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य राहील. गोपनीयतेचा भंग झाल्यास विद्यापीठाच्या नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
एखाद्या महाविद्यालयात संबंधित विषयाचा तज्ज्ञ प्राध्यापक उपलब्ध नसल्यास नजीकच्या महाविद्यालयातील पात्र प्राध्यापकांची मदत घेण्याची मुभा विद्यापीठाने दिली आहे. प्रश्नसंच तयार करण्यासाठी विद्यापीठ परिनियम ४१५ (१) नुसार प्राश्निकाची नियुक्ती बंधनकारक राहणार असून, परीक्षा पूर्ण झाल्यानंतर निवडलेली प्रश्नपत्रिका व आदर्श उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या परीक्षा गोपनीय (पूर्वार्ध) विभागाकडे सादर करावी लागणार आहे. या निर्णयामुळे निकाल प्रक्रिया अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत