पावसाच्या सरींत फैजपूरात संविधान रक्षणाचा निर्धार आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात हजारोंचा मोर्चा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
पावसाच्या सरींत फैजपूरात संविधान रक्षणाचा निर्धार
आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात हजारोंचा मोर्चा; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
फैजपूर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी) : मुसळधार पावसालाही न जुमानता अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात गुरुवारी फैजपूर येथे संविधान बचाव महासंघर्ष मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या मोर्चात रावेर व यावल तालुक्यातील विविध गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आयोजकांच्या माहितीनुसार, मोर्चात सुमारे पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले असून महिलांची उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.
मोर्चाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर ‘जय भीम’, ‘जय संविधान’ आणि ‘आंबेडकर, आंबेडकर’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मुसळधार पावसातही सहभागी नागरिकांनी शिस्तबद्धपणे विभागीय कार्यालयाच्या दिशेने मोर्चा काढला.
मोर्चाचे नेतृत्व अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, रावेर–यावल तालुका यांचे मुख्य समन्वयक अनोमदर्शी तायडे यांनी केले. यावेळी भुसावळ येथील जगनभाऊ सोनवणे तसेच सामाजिक कार्यकर्ते शमीभा पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी अनोमदर्शी तायडे म्हणाले की, “अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण हा केवळ आरक्षणाचा प्रश्न नसून सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि समाजाच्या एकतेशी निगडित गंभीर विषय आहे. आमचा संघर्ष कोणत्याही जातीविरोधात नसून अनुसूचित जातीतील सर्व घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी आहे. समाजात फूट पाडण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही.”
ते पुढे म्हणाले, “आरक्षणाचा लाभ सर्व वंचित घटकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी अनुसूचित जातींमध्ये विभागणी करणे हा मार्ग योग्य नाही. शिक्षण, रोजगार, आर्थिक संधी आणि प्रभावी कल्याणकारी योजनांद्वारे मागास घटकांना सक्षम करणे ही शासनाची जबाबदारी आहे.”
तसेच, “हा मोर्चा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांच्या रक्षणासाठी आहे. शासनाने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व संबंधित घटकांशी संवाद साधून जनतेच्या भावना लक्षात घ्याव्यात,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोर्चा विभागीय कार्यालयात पोहोचल्यानंतर मागण्यांचे निवेदन प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्याकडे सादर करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. विविध सामाजिक संघटना, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत