अमळनेरमध्ये धाडसी बचावकार्य : पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले
अमळनेरमध्ये धाडसी बचावकार्य : पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या बाळासह कुटुंबाला सुखरूप बाहेर काढले
अमळनेर (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी): शहरातील भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत मुसळधार पावसामुळे नाल्याला आलेल्या पुराने भीषण परिस्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरात शिरल्याने अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब घरात अडकून पडले होते. अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता धाडसी बचावकार्य करत सर्वांना सुरक्षितस्थळी हलविले.
पुराचे पाणी छातीपर्यंत पोहोचले होते आणि प्रवाह अत्यंत वेगवान असल्याने बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचणेही कठीण झाले. घरात एक महिन्याचे बाळ, महिला व लहान मुले उंच पलंगावर उभे राहून जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होती.
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने बचाव पथक रवाना केले. आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, अग्निशमन कर्मचारी फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका संदानशीव आणि पवन बिऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दोर व लाइफ जॅकेटच्या साहाय्याने मानवी साखळी तयार करण्यात आली.
सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथक घरापर्यंत पोहोचले. एक महिन्याच्या बाळाला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून त्याच्या आईसह तीन महिला, तीन लहान मुले व इतर सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. सर्वांना जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले.
या धाडसी आणि वेळेवर केलेल्या बचावकार्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, अमळनेर नगरपालिकेच्या अग्निशमन दल व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत