गाडेगाव घाटात उभ्या ट्रकवर कार आदळली; दोघांचा मृत्यू जळगाव-नेरी महामार्गावरील अपघातात तिघे चुलतभाऊ गंभीर; कारचा चुराडा
गाडेगाव घाटात उभ्या ट्रकवर कार आदळली; दोघांचा मृत्यू
जळगाव-नेरी महामार्गावरील अपघातात तिघे चुलतभाऊ गंभीर; कारचा चुराडा
प्रतिनिधी | जळगाव
जळगाव-नेरी महामार्गावरील गाडेगाव घाटात वळणावर नादुरुस्त अवस्थेत उभा असलेला ट्रक न दिसल्याने भरधाव कार त्यावर जाऊन आदळली. चालकाने नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला; मात्र वेग अधिक असल्याने कार ट्रकवर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. अपघातात कारचा अक्षरशः चुराडा झाला.
गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगावहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना हा अपघात झाला. मृतांमध्ये कारचालक इस्त्रायल शेख इरफान शेख (वय २१, रा. पिंपळदरी, ता. सिल्लोड) आणि पंकज हरीष बेंडवाल (वय ३४, रा. इंदूर) यांचा समावेश आहे. तर प्रदीप ओमप्रकाश परदेशी (वय ३५), अनुज रामावत परदेशी (वय २५), गिरीष योगेश चव्हाण (वय २२, सर्व रा. खेडी, जळगाव) आणि गौरव राजू परदेशी (रा. इंदूर) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.
खेडी येथील परदेशी कुटुंबातील प्रदीप, अनुज आणि गौरव हे तिघे चुलत भाऊ असून ते कन्स्ट्रक्शन व्यवसायात आहेत. पंकज बेंडवाल हा त्यांचा मित्र होता. गुरुवारी कामाच्या निमित्ताने सर्वजण कार (एमएच १९ ईपी ९०६६)ने जळगावहून सिल्लोडकडे निघाले होते. गाडेगाव घाटातील एका वळणावर गुजरात पासिंगचा नादुरुस्त ट्रक (जीजे ०४ एएक्स २२८०) उभा होता. हा ट्रक न दिसल्याने कार त्यावर आदळली.
इस्त्रायल हा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा
सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील शेख कुटुंबातील इस्त्रायल हा सर्वात मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात दोन लहान भावंडे व आई-वडील आहेत. घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबीय रात्री दहाच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल झाले. इस्त्रायल गुरुवारी सकाळी घरातून बाहेर पडला होता. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
क्रेनच्या साहाय्याने कारचा पत्रा वाकवून मृतदेह बाहेर काढले
अपघातानंतर इतर वाहनधारकांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. क्रेनच्या साहाय्याने कारचा पत्रा वाकवून जखमी तसेच मृतदेहांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून परदेशी कुटुंबाचा पत्ता व दूरध्वनी क्रमांक शोधून त्यांच्याशी संपर्क साधला. रात्री आठ वाजेपर्यंत सर्व सहा जणांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
पंकज मूळचा जळगावचा; मार्केटिंगच्या कामासाठी इंदूरला स्थायिक
मृत पंकज बेंडवाल हा मूळचा जळगावचा रहिवासी होता. मार्केटिंगच्या कामानिमित्त तो सध्या इंदूर येथे स्थायिक होता. तीन दिवसांपूर्वीच तो जळगावात आला होता. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले असून त्याला सहा महिन्यांची मुलगी आहे. अपघाताची माहिती मिळताच जळगावात राहणाऱ्या त्याच्या आत्याने रुग्णालय गाठले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत