Contact Banner

डिगंबर महाराज दिंडी पंढरपूरपासून अवघ्या कोसावर; आज चंद्रभागातीरी भव्य स्वागत

 

digambar-maharaj-dindi-pandharpur-ashadhi-ekadashi-wari

गुरुवारी आष्टीत मुक्काम; वारकऱ्यांना विठुरायाच्या दर्शनाची ओढ

डिगंबर महाराज दिंडी पंढरपूरपासून अवघ्या कोसावर; आज चंद्रभागातीरी भव्य स्वागत

प्रतिनिधी | आमोदा

अखंड विठ्ठलनामाचा गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करत वै. डिगंबर महाराज दिंडी पंढरपूरपासून अवघ्या कोसावर पोहोचली आहे. गुरुवारी दिंडीचा मुक्काम आष्टी येथे झाला. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये आषाढी एकादशीच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून विविध गावांमधून प्रवास करताना दिंडीच्या माध्यमातून कीर्तन, भारूड, हरिपाठ आणि अखंड नामस्मरणाच्या वातावरणात भक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविण्यात आला. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत करून वारकऱ्यांसाठी भोजन, निवास तसेच अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था केली.

दिंडी चालक दुर्गादास महाराज नेहेते यांच्या मार्गदर्शनाखाली




सुरू असलेल्या या पायी वारीत शिस्त, सेवा आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला मिळत आहे. विठ्ठलाच्या भेटीच्या आनंदाने भारावलेले वारकरी आता विठुरायाच्या चरणी मस्तक टेकविण्यासाठी आतुर झाले आहेत.



चंद्रभागा तीरावर भव्य स्वागत

शुक्रवारी (दि. १७) सकाळी चंद्रभागा तीरावर दिंडीचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. वै. डिगंबर महाराज वारकरी संप्रदाय शिक्षण प्रसारक समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, कोषाध्यक्ष किशोर बोरोले, सहसचिव विजय ढाके तसेच कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते वारकऱ्यांचे स्वागत होईल.

स्वागतानंतर दिंडी पंढरपूर येथील वै. डिगंबर महाराज मठात दाखल होणार आहे. तेथे आषाढी एकादशीपर्यंत विशेष सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या काळात दररोज काकड आरती, हरिपाठ, कीर्तन, प्रवचन आणि भजन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, हजारो भाविकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर नगरीत भक्तीचा महासागर उसळणार असून, वै. डिगंबर महाराज दिंडीचे आगमन हा सोहळ्यातील भावपूर्ण क्षण ठरणार आहे. त्यामुळे दिंडीत सहभागी वारकऱ्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.