गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या एनएसएस विभागातर्फे नाशिराबाद येथे ‘हरीत यज्ञ’ उत्साहात
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या एनएसएस विभागातर्फे नाशिराबाद येथे ‘हरीत यज्ञ’ उत्साहात
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे नाशिराबाद येथे ‘हरीत यज्ञ’ विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमात प्रा. अँजेला एलिस व प्रा. निलेश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली चतुर्थ वर्षातील विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, प्राध्यापक तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संरक्षणाची सामूहिक शपथ घेऊन करण्यात आली.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत विद्यार्थ्यांनी हवामान बदल, वृक्षसंवर्धन, जैवविविधतेचे महत्त्व आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण या विषयांवर प्रभावी व आकर्षक पोस्टर्स सादर करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
आरोग्य शिक्षण व जनजागृती सत्रात वृक्षांचे मानवी आरोग्य, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासातील योगदान अधोरेखित करण्यात आले. वाढते प्रदूषण, तापमानवाढ आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमातील जनजागृती रॅली विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी "झाडे लावा, झाडे जगवा", "हरित पृथ्वी, निरोगी जीवन" आणि "एक विद्यार्थी – एक वृक्ष" अशा पर्यावरणपूरक घोषणा देत नाशिराबाद परिसरातून फेरी काढली. या रॅलीद्वारे नागरिकांना वृक्षलागवडीचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभागाचे आवाहन करण्यात आले.
यावेळी परिसरात विविध देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी स्वीकारली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. "आज एक वृक्ष लावा... उद्याचे भविष्य वाचवा" हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत