Contact Banner

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे मोठे यश

 

13-year-old-boy-recovers-from-encephalitis-after-successful-treatment-at-dr-ulhas-patil-hospital

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार; डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांचे मोठे यश

जळगाव : यावल तालुक्यातील १३ वर्षीय बालकाला झालेल्या गंभीर एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) आजारावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञांनी वेळेत निदान करून अत्याधुनिक उपचार केल्याने त्याचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झालेल्या या बालकाची प्रकृती आता पूर्णपणे सुधारली असून तो निरोगी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील या बालकाला काही दिवसांपासून तीव्र ताप होता. त्यानंतर त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि वारंवार झटके येऊ लागले. प्रकृती झपाट्याने खालावत गेल्याने तो बेशुद्ध झाला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल केले.

रुग्णालयात दाखल होताच बालकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे लक्षात आले. बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. अनंत बेंडाळे, डॉ. उमाकांत अणेकर आणि डॉ. सुयोग तन्नीरवार यांनी कोणताही विलंब न करता बालकाला अतिदक्षता विभागात हलवून व्हेंटिलेटरवर ठेवले. त्याचबरोबर आवश्यक रक्ततपासण्या, मेंदूच्या कार्याचे मूल्यमापन तसेच एमआरआय तपासणी तातडीने करण्यात आली







एमआरआय अहवालात मेंदूला सूज आल्याचे स्पष्ट झाले. तपासणीनंतर बालकाला एन्केफेलायटीस (मेंदूज्वर) झाल्याचे निदान झाले. हा आजार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून वेळेत उपचार न झाल्यास जीवाला धोका निर्माण होण्याबरोबरच मेंदूवर कायमस्वरूपी परिणाम होण्याची शक्यता असते.

निदान होताच वैद्यकीय पथकाने झटके नियंत्रित करणारी औषधे, संसर्गावरील उपचार तसेच अतिदक्षता विभागातील सर्व आवश्यक उपचार तातडीने सुरू केले. डॉ. नावेद, डॉ. मिमोनी, डॉ. निशीगंधा यांच्यासह अतिदक्षता विभागातील डॉक्टर, भूलतज्ज्ञ आणि परिचारिका यांनी रात्रंदिवस बालकाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्याने संपूर्ण वैद्यकीय पथकाने अथक परिश्रम घेतले.

उपचारांना अपेक्षित प्रतिसाद मिळू लागल्यानंतर बालकाच्या मेंदूवरील सूज कमी झाली, झटके थांबले आणि त्याची शुद्ध परत आली. त्यानंतर त्याला यशस्वीरित्या व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले. सध्या बालकाची प्रकृती स्थिर असून तो पूर्णपणे बरा झाला आहे. या यशस्वी उपचारानंतर कुटुंबीयांनी डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाचे आभार मानले.

कोट :
"एन्केफेलायटीस म्हणजे मेंदूला आलेली सूज हा अत्यंत गंभीर आजार आहे. ताप, तीव्र डोकेदुखी, वारंवार झटके, बेशुद्धावस्था, गोंधळलेली मानसिक अवस्था किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसल्यास तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणे आवश्यक आहे. वेळेत निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते."
– डॉ. मिमोनी, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.