गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रमाचा उत्साहात समारोप; देशभरातील २७५ प्राध्यापकांचा सहभाग
गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रमाचा उत्साहात समारोप; देशभरातील २७५ प्राध्यापकांचा सहभाग
लेवाजगत न्युज जळगाव :-
गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था) येथील विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित "इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणि सहाय्यक प्रणाली" या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा उत्साहात समारोप झाला. ऑनलाइन माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यांतील २७५ प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग नोंदविला.
डॉ. उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, चार्जिंग प्रणाली, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक, सौर ऊर्जेवर आधारित ईव्ही चार्जिंग, फ्युएल सेल तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग तसेच ऑप्टिमायझेशन यांसारख्या आधुनिक विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान विविध तज्ज्ञांनी ईव्ही चार्जिंग तंत्रज्ञान, वाहनांची विश्वासार्हता, स्मार्ट ग्रिड, व्हेईकल-टू-ग्रिड (V2G) प्रणाली, फ्युएल सेल तंत्रज्ञान, ग्राफीन आधारित नॅनो-कॉम्पोझिट साहित्य, ऊर्जा साठवण प्रणाली तसेच मॅटलॅब आणि सायलॅबद्वारे इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेलिंग व विश्लेषण याबाबत सखोल माहिती दिली.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. महेश एच. पाटील यांनी केले, तर समन्वयक म्हणून डॉ. सचिन आर. महेश्री यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल मयूर पाटील यांनी केले.
यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन करत अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमुळे शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत