लैंगिक छळमुक्त कार्यस्थळासाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांना पॉश कायद्याचे मार्गदर्शन गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ओरिएंटेशन कार्यक्रम
लैंगिक छळमुक्त कार्यस्थळासाठी शिक्षक-कर्मचाऱ्यांना पॉश कायद्याचे मार्गदर्शन
गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ओरिएंटेशन कार्यक्रम
जळगाव : महिलांसाठी सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि समानतेवर आधारित कार्यस्थळ निर्माण करण्याच्या उद्देशाने गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी पॉश कायद्यावर विशेष ओरिएंटेशन कार्यक्रम घेण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमात ‘कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम, २०१३’ या कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या अॅड. डॉ. ललिता सपकाळे यांनी पॉश कायद्याची गरज, उद्दिष्टे आणि संस्थात्मक पातळीवरील अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी संवेदनशील आणि सन्मानपूर्ण वातावरण निर्माण करणे ही संस्थांची कायदेशीर जबाबदारी असून त्यासोबतच सामाजिक बांधिलकीदेखील आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी लैंगिक छळाची संकल्पना व विविध प्रकार, कर्मचारी हक्क व जबाबदाऱ्या, अंतर्गत तक्रार समितीची रचना व कार्यपद्धती तसेच तक्रार नोंदविण्यापासून तिच्या निवारणापर्यंतची प्रक्रिया उदाहरणांसह समजावून सांगितली. अन्याय किंवा लैंगिक छळाच्या घटना घडल्यास त्या गप्प न बसता योग्य प्रक्रियेद्वारे तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमादरम्यान शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. संवादात्मक पद्धतीने पार पडलेल्या या सत्रामुळे पॉश कायद्याबाबत उपस्थितांमध्ये अधिक स्पष्टता निर्माण झाली. तसेच कार्यस्थळी परस्पर सन्मान, समानता आणि सुरक्षिततेची भावना दृढ झाली.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले. सुरक्षित, संवेदनशील आणि सन्मानजनक कार्यसंस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत