नदीच्या डोहात १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; यावल शहरावर शोककळा
लेवाजगत न्यूज यावल : रविवारची सुट्टी कुटुंबीयांसोबत घालवण्यासाठी गेलेल्या यावल शहरातील १७ वर्षीय तरुणाचा नदीच्या डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना रविवार, दि. १९ जुलै रोजी हरिपुरा धरणाच्या वरील बाजूस घडली. जयेश संजय फेगडे (रा. महाजन गल्ली, यावल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
जयेश हा आपल्या चुलत भावासह व वहिनीसोबत हरिपुरा धरण परिसरात फिरण्यासाठी गेला होता. परिसरातील निसर्गाचा आनंद घेत असताना तो नदीच्या डोहात पोहण्यासाठी उतरला. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक पाण्यात बुडाला.
जयेशला वाचविण्यासाठी नातेवाइकांनी तातडीने प्रयत्न केले. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने जयेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांसह नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
जयेश हा होमगार्ड संजय सिताराम फेगडे यांचा मुलगा होता. कुटुंबातील एकुलता एक मुलगा असलेल्या जयेशच्या आकस्मिक मृत्यूने फेगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे यावल शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील पुढील तपास करीत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत