पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम; महिला व बालकांच्या 'वृक्ष दिंडी'ने वेधले लक्ष
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण
श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाचा उपक्रम; महिला व बालकांच्या 'वृक्ष दिंडी'ने वेधले लक्ष
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, जळगाव यांच्या वतीने केसी पार्क परिसरात भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिला, बालके आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात पर्यावरण जनजागृतीचे प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेली 'वृक्ष दिंडी' मोठ्या उत्साहात काढण्यात आली. महिला व बालकांनी हातात विविध वृक्षांची रोपे, पर्यावरण जनजागृतीचे फलक आणि "झाडे लावा, झाडे जगवा", "एक वृक्ष – एक जीवन" अशा घोषणांनी केसी पार्क परिसर दुमदुमून सोडला. दिंडीद्वारे पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
यानंतर परिसरात विविध पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षांचे संगोपन करण्याची शपथ घेत प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील वाणी यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "आज लावलेला प्रत्येक वृक्ष ही पुढील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट आहे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे."
कार्यक्रमाला सुनील वाणी, सोनाली वाणी, दुर्गा पाटील, तेजस्विनी, भूषण लाडवांजारी यांच्यासह परिसरातील महिला, बालके आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे हा पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
श्री अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत