Contact Banner

कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा; डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी

 

ashadhi-ekadashi-celebrated-at-dr-varsha-patil-womens-college-with-vitthal-rakhumai-fabric-art-and-dindi

कापडावर साकारली विठ्ठल-रखुमाईची प्रतिमा; डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेजमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी






जळगाव (लेवाजगत न्यूज प्रतिनिधी): आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्समध्ये भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी कापडावर विठ्ठल-रखुमाईची आकर्षक प्रतिमा साकारत पारंपरिक दिंडी काढली आणि संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने दुमदुमून गेला.

कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रखुमाई यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. यावेळी गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (जीआयएमआर)चे संचालक डॉ. प्रशांत वारके, डॉ. वर्षा पाटील बीसीए महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. नीलिमा वारके, डॉ. उल्हास पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नयना झोपे तसेच डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्सच्या प्राचार्या प्रा. कविता देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

आषाढी एकादशीचे औचित्य साधत विद्यार्थिनींनी फॅब्रिक पेंटिंगच्या माध्यमातून कापडावर विठ्ठल-रखुमाईची आकर्षक चित्रे साकारून आपल्या कलागुणांचे प्रभावी दर्शन घडविले. या कलाकृतींना उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यानंतर महाविद्यालयाच्या वतीने टाळ-मृदुंगाच्या गजरात पारंपरिक दिंडीचे आयोजन करण्यात आले. "विठ्ठल... विठ्ठल..." या अखंड नामघोषात विद्यार्थिनी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. दिंडीनंतर सर्वांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमातून विद्यार्थिनींना वारकरी परंपरेची ओळख करून देतानाच भारतीय संस्कृतीबद्दल आदर, सामाजिक एकात्मता आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.