हतनूर धरणाचे २२ दरवाजे एक मीटरने उघडले; तापी नदीत मोठा विसर्ग सुरू
हतनूर धरणाचे २२ दरवाजे एक मीटरने उघडले; तापी नदीत मोठा विसर्ग सुरू
सावदा लेवाजगत न्यूज प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वेगाने वाढ होत असून, पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धरण प्रशासनाने रविवारी सकाळी १० वाजता धरणाचे २२ वक्राकार दरवाजे १ मीटरने उघडले आहेत. यामुळे तापी नदीपात्रात ४९ हजार ५८२ क्युसेक (१४०४ क्युमेक्स) वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.
सकाळी १० वाजेच्या अहवालानुसार हतनूर धरणाची पाणीपातळी २१२.१८० मीटरवर पोहोचली असून, धरणाची पूर्ण क्षमता २१४.००० मीटर आहे. धरणातील एकूण जलसाठा २८९.०० दलघमी म्हणजेच ७४.४८ टक्के, तर जिवंत जलसाठा १५६.०० दलघमी म्हणजे ६१.१८ टक्के इतका झाला आहे. गेल्या २४ तासांत धरण परिसरात २८ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील एकूण पाऊस ७६ मिमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक कायम आहे.
धरणातून तापी नदीत ४९ हजार ५८२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असतानाच मुख्य कालव्यातून ३०० क्युसेक (८.५० क्युमेक्स) पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, उजव्या कालव्याचे दरवाजे सध्या बंद ठेवण्यात आले आहेत.
पाणलोट क्षेत्रातील विविध भागांतही जोरदार पावसाची नोंद झाली आहे. बऱ्हाणपूर येथे ५२ मिमी, देडतलाई ५८.२ मिमी, लखपुरी ९.४ मिमी, अकोला ६.४ मिमी, टेक्सा २७.२ मिमी, एरंडी ३२ मिमी, गोपालखेडा ३ मिमी, चिखलदरा ८२.२ मिमी आणि लोहारा २१ मिमी पाऊस झाला आहे. एकूण पाणलोट क्षेत्रात ३८८.४ मिमी, तर हतनूर परिसरात ८८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात किंवा नदीकिनारी जाणे टाळावे, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत आणि स्थानिक प्रशासन तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत