जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर्मापक एसीबीच्या जाळ्यात; १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
जळगाव भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर्मापक एसीबीच्या जाळ्यात; १५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक
जळगाव |प्रतिनिधी-
जळगाव जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयातील भूकर्मापक जितेंद्र प्रकाश पाटील (वय ४५) याला प्रलंबित काम करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी (दि. १ जुलै) रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या जळगाव शहरातील वडिलोपार्जित मालमत्तेच्या नोंदीत झालेल्या त्रुटीमुळे त्यांच्या वडिलांचे नाव संबंधित नोंदीतून वगळले गेले होते. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयाने नोंद दुरुस्त करून वडिलांचे नाव पुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. मात्र आदेशानंतरही आवश्यक कार्यवाही प्रलंबित राहिल्याने तक्रारदाराने वारंवार पाठपुरावा केला.
तपासादरम्यान आरोपी भूकर्मापकाने संबंधित काम करून देण्यासाठी "साहेबांसाठी" १० हजार रुपये आणि स्वतःसाठी ५ हजार रुपये, अशी एकूण १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी तक्रारदाराने २५ जून २०२६ रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याने एसीबीने सापळा रचला. बुधवारी सापळा कारवाईदरम्यान आरोपीने १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ ताब्यात घेतले.
या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली.
या कारवाईचे पर्यवेक्षण पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले असून, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
दरम्यान, याच कार्यालयाच्या अधिपत्याखालील नगर भूमापन विभागातील कथित गैरप्रकारांमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या भूमी अभिलेख विभागात झालेल्या या कारवाईमुळे पुढील तपासात आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित व्यक्तींवरील आरोप हे आरोपच असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत