डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
डॉ.गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा
जळगाव | प्रतिनिधी-
गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे आंतरराष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डॉक्टर व्यवसायाचे महत्त्व, रुग्णसेवेतील नैतिकता आणि समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली.
कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. उमाकांत चौधरी आणि डॉ. साझिया खान यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्यांचे पालन, रुग्णांशी संवेदनशील वर्तन, सेवाभाव आणि व्यावसायिक प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. भविष्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी ज्ञानासोबतच मानवी मूल्येही जोपासावीत, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणातील समर्पण, सातत्यपूर्ण अध्ययन, शिस्त, सेवाभाव आणि उत्कृष्ट डॉक्टर होण्यासाठी आवश्यक गुणांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत समाजहितासाठी कार्य करण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत