Contact Banner

जामनेर तालुक्यात संतापजनक घटना: १३ वर्षीय शाळकरी मुलीवर वृद्धाचा अतिप्रसंग; फत्तेपूर पोलिसांत गुन्हा दाखल


जामनेर तालुक्यात संतापजनक घटना: १३ वर्षीय शाळकरी मुलीवर वृद्धाचा अतिप्रसंग; फत्तेपूर पोलिसांत गुन्हा दाखल

लेवाजगत न्यूज (नितीन इंगळे):

जामनेर: तालुक्यातील देऊळगावगुजरी आणि गोद्रीतांडा येथील आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच, १८ जुलै रोजी राहेरा येथे एका १३ वर्षीय शाळकरी मुलीवर वृद्धाने अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तालुक्यात महिला व बालिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.




शौचालयात गाठून केला अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार, राहेरा (ता. जामनेर) येथील रहिवासी इक्बाल अफजल तडवी हे मजुरीसाठी शेतात गेले होते, तर त्यांची पत्नी बाहेरगावी गेली होती. दुपारी १३ वर्षीय मुलगी जिल्हा परिषद शाळेजवळील सार्वजनिक शौचालयात गेली असता, मूळचा लिहापारध (ता. भोकरदन, जि. जालना) येथील रहिवासी असलेला वृद्ध हिरालाल बालचंद डोभाल याने तिला एकटे गाठून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

मुलीने दाखवले धाडस, आरोपी पसार

या प्रकारामुळे मुलगी प्रचंड भेदरली, मात्र तिने धीर न सोडता वृद्ध आरोपीच्या हाताला जोरात चावा घेतला आणि स्वतःची सुटका करून तिथून पळ काढला. लोणी-राहेरा रस्त्यावर शेतातून घरी परतत असलेल्या आजीला पाहताच मुलीने रडत रडत घडलेला प्रकार सांगितला. नातेवाईकांनी तातडीने राहेरा येथील जीवन रामलाल राजपूत (ज्याचा आरोपी हा सासरा आहे) यांच्या घरी जाऊन विचारणा केली. मात्र, गुन्हा उघडकीस आल्याचे समजताच आरोपी हिरालाल डोभाल तिथून पसार झाला होता.

पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी तात्काळ फत्तेपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी हिरालाल बालचंद डोभाल विरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो - POCSO) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी अधिनियम १९८९) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.