Contact Banner

जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकची वारकरी महिलांना धडक; तिघींचा मृत्यू, चौघींवर उपचार

 

jejuri-palkhi-truck-accident-three-warkari-women-killed-four-injured

जेजुरीजवळ दिंडीतील ट्रकची वारकरी महिलांना धडक; तिघींचा मृत्यू, चौघींवर उपचार

पुणे लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-

आषाढी वारीदरम्यान सोमवारी सकाळी जेजुरीजवळ झालेल्या भीषण अपघातात तीन वारकरी महिलांचा मृत्यू झाला, तर चार महिला गंभीर जखमी झाल्या. जखमींवर जेजुरीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे पालखी सोहळ्यावर शोककळा पसरली आहे.

माहितीनुसार, श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवडहून जेजुरी येथे मुक्कामी पोहोचल्यानंतर सासवड-जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली. रघुनाथ महाराज पोखरबिसीकर दिंडीशी संबंधित ट्रकने रस्त्यालगत असलेल्या सात वारकरी महिलांना धडक दिल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिक, वारकरी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना जेजुरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी तीन महिलांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत महिला या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातातील चार जखमी महिलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातानंतर संबंधित ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, नेमका अपघात कशामुळे झाला याचा तपास सुरू आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे जेजुरी परिसरात शोककळा पसरली असून, पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांनी मृत वारकरी महिलांना श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान, वारीदरम्यान वाहनचालकांनी अधिक दक्षता बाळगावी आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणीही व्यक्त होत आहे.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.