खडसे-महाजन पुन्हा जवळ येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
खडसे-महाजन पुन्हा जवळ येणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
लेवाजगत न्यूज जळगाव : राज्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता निर्माण झाली आहे. खडसे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी थेट गिरीश महाजन यांच्या जामनेर येथील निवासस्थानी भेट दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्याला भाजपमध्ये परतण्याचे निमंत्रण दिल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर आता खडसेंकडून गिरीश महाजन यांच्याशी संवादाचा पुढाकार घेतला जात असल्याने त्यांच्या संभाव्य 'घरवापसी'च्या चर्चांना पुन्हा हवा मिळाली आहे.
जामनेर भेटीत नेमकं काय घडलं?
खडसेंचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते आणि सुनील नेवे यांनी जामनेर येथे गिरीश महाजन यांची भेट घेत अमृत महोत्सवी सोहळ्याचे निमंत्रण दिले. सर्वपक्षीय नेते कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे सांगत महाजन यांनीही सोहळ्याला यावे, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी स्वागत समितीत महाजन यांचे नाव समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, महाजन यांनी त्यावर मिश्कील प्रतिक्रिया देत समितीत आपले नाव नको, असे स्पष्ट केले. तरीही त्यांनी निमंत्रण पत्रिका बारकाईने पाहिली आणि कार्यक्रमाबाबत सकारात्मक संकेत दिल्याची चर्चा आहे.
राजकीय वितुष्टाला पूर्णविराम मिळणार?
जळगावच्या राजकारणात खडसे आणि महाजन यांच्यातील संघर्ष अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय राहिला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय शाब्दिक युद्धामुळे दोन्ही नेत्यांमधील दुरावा कायम राहिला.
मात्र, खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या सहाय्यकांनी महाजनांची घेतलेली भेट आणि कार्यक्रमाचे दिलेले निमंत्रण यामुळे नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. आता गिरीश महाजन या सोहळ्याला उपस्थित राहतात का आणि दोन्ही नेत्यांमधील राजकीय वितुष्टाला खरोखरच पूर्णविराम मिळतो का, याकडे जळगावसह राज्याचे लक्ष लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत