जळगावात उद्या लोकनेते स्व. मधुकरराव चौधरी यांच्या पुतळ्याचे अनावरण; न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते सोहळा
जळगावात उद्या लोकनेते स्व. मधुकरराव (बाळासाहेब) चौधरी यांच्या पुतळ्याचे अनावरण; न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार ऐतिहासिक सोहळा
जळगाव | प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष, माजी शिक्षणमंत्री, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि लोकसेवक स्व. मधुकररावजी तथा बाळासाहेब चौधरी यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी त्यांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा भव्य सोहळा आज, बुधवार (८ जुलै) रोजी सकाळी ११ वाजता धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, शंकरराव नगर, जुना खेडी रोड, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
समाजासाठी आयुष्यभर निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या स्व. मधुकरराव चौधरी यांच्या स्मृती जतन करण्यासह त्यांच्या विचारांचा आणि सेवाभावी जीवनाचा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अनावरण भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय युवा विकास व क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ राहणार आहेत. याशिवाय विधान परिषद सदस्य व माजी मंत्री एकनाथराव खडसे, जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे, आमदार सत्यजित तांबे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच कुलगुरू, माजी कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी यांचीही विशेष उपस्थिती लाभणार असल्याने हा सोहळा राज्यातील शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
स्व. मधुकरराव चौधरी यांनी महाराष्ट्राच्या शिक्षण, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार, शैक्षणिक संस्थांची उभारणी, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने पाठपुरावा तसेच शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा देण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांच्या सार्वजनिक जीवनातील कार्याचा गौरव आणि त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी, या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आला आहे.
या कार्यक्रमासाठी धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीने व्यापक तयारी पूर्ण केली असून, जिल्ह्यासह राज्यभरातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
या सोहळ्याचे आयोजन धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी, जळगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीषदादा मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सुनील मधुकर पाटील, सचिव डॉ. प्रमोद रामभाऊ चौधरी, सहसचिव पुरुषोत्तम यशवंत पाटील, खजिनदार निळकंठ जगन्नाथ काळे, सदस्य चंदन सुधाकर अत्तरदे, डॉ. विनय भास्कर पाटील, स्वीकृत सदस्य धनंजय शिरीष चौधरी, तसेच प्राचार्य डॉ. राकेश पितांबर चौधरी आणि डॉ. पराग अरुण नारखेडे यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत