जळगावात आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र सुरू; आता आधारच्या सेवांसाठी मुंबईच्या फेऱ्यांची गरज नाही
जळगावात आधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र सुरू; आता आधारच्या सेवांसाठी मुंबईच्या फेऱ्यांची गरज नाही
जळगाव | प्रतिनिधी
आधार कार्डाशी संबंधित विविध कामांसाठी नागरिकांना मुंबईपर्यंत जाण्याची गरज आता उरणार नाही. जळगाव शहरातील शिरसोली रोड परिसरात अत्याधुनिक आधार ग्राहकसेवा केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रामुळे आधार नोंदणी, माहिती अद्ययावत करणे आणि तक्रार निवारण यांसारख्या सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
शिरसोली रोडवरील पुरुषोत्तम नगर, डी-मार्टजवळील मिश्री हाईट्स येथे या केंद्राचे उद्घाटन UIDAI मुंबई प्रादेशिक कार्यालयाचे उपमहासंचालक कॅप्टन लवकेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी तहसीलदार शीतल राजपूत, उपसंचालक मंदार जेवरे तसेच सेवा पुरवठादार संस्था बीएलएसचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
यापूर्वी आधारशी संबंधित तांत्रिक किंवा गुंतागुंतीच्या प्रकरणांसाठी नागरिकांना मुंबईतील प्रादेशिक कार्यालयात जावे लागत होते. त्यामुळे वेळ, प्रवास आणि आर्थिक खर्च वाढत होता. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला आणि ग्रामीण भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. आता हे अत्याधुनिक केंद्र सुरू झाल्याने बहुतांश सेवा जळगावमध्येच उपलब्ध होणार असून नागरिकांची गैरसोय दूर होईल.
या केंद्रात नवीन आधार नोंदणी, नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि बायोमेट्रिक माहिती अद्ययावत करण्यासह ५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांचे मोफत बायोमेट्रिक अपडेट करण्यात येणार आहे. तसेच लोकसंख्याशास्त्रीय दुरुस्ती, तक्रार निवारण आणि इतर आधारविषयक सेवाही एकाच ठिकाणी मिळणार आहेत.
केंद्रात वातानुकूलित सुविधा, आधुनिक संगणक प्रणाली, सुरक्षित नेटवर्क, प्रशस्त प्रतीक्षागृह, आठ स्वतंत्र सेवा काऊंटर, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे तसेच दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी घरपोच सेवा देण्याची सुविधाही उपलब्ध राहणार आहे.
हे केंद्र आठवड्याचे सातही दिवस सुरू राहणार असून, टोकन प्रणालीद्वारे नागरिकांना सेवा दिली जाईल. तसेच ऑनलाइन वेळ निश्चित करून येण्याची सुविधाही उपलब्ध असल्याने गर्दी आणि रांगेत तासन्तास थांबण्याचा त्रास कमी होणार आहे. या केंद्रामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना आधारविषयक सेवा अधिक जलद, सुलभ आणि दर्जेदार पद्धतीने मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे.
जळगाव, Aadhaar, UIDAI, आधार सेवा केंद्र, Jalgaon News, UIDAI Mumbai, आधार कार्ड अपडेट, आधार नोंदणी, बायोमेट्रिक अपडेट, आधार ग्राहक सेवा केंद्र, Maharashtra News, BLS, जिल्हाधिकारी रोहन घुगे, शिरसोली रोड, Jalgaon Aadhaar Centre




कोणत्याही टिप्पण्या नाहीत