२ लाखांपर्यंत कर्जमाफी; ५० हजारांची अट रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
२ लाखांपर्यंत कर्जमाफी; ५० हजारांची अट रद्द, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
मुंबई | प्रतिनिधी-
राज्यातील शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा करत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' अधिक व्यापक करण्याचा निर्णय जाहीर केला. याअंतर्गत यापूर्वी लागू असलेली ५० हजार रुपयांच्या लाभाची अट रद्द करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या योजनेमुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना तब्बल ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नव्हता. मात्र, आता थकबाकी जास्त असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे.
तसेच, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची अटही हटविण्यात आली आहे. अतिरिक्त आर्थिक भार पडला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राज्य शासन कृषी क्षेत्रासाठी दरवर्षी सुमारे ९५ हजार कोटी रुपये खर्च करत असल्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या वीजबिलासाठी २५ हजार कोटी रुपये अनुदान दिले जाते. कापूस खरेदीसाठी १० हजार ८८३ कोटी, तर सोयाबीन खरेदीसाठी ३ हजार १९८ कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. ठिबक सिंचनासाठी प्रलंबित २१७ कोटी रुपये लवकरच वितरित केले जाणार असून कृषी समृद्धी योजनेचा उर्वरित निधीही उपलब्ध करून दिला जाईल.
कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यातील गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपर्यंत, तर गुन्हे सिद्धतेचा दर ५२.६ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईत जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत ४३९ कोटी रुपये गोठविण्यात यश आले असून, छोट्या आर्थिक फसवणुकीतील रक्कम नागरिकांना तातडीने परत करण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई, पोलीस दलाचे आधुनिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा तपासात वाढता वापर, तसेच जलसंपदा आणि पायाभूत सुविधांवरील विविध प्रकल्पांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
समारोपावेळी मुख्यमंत्री म्हणाले, "शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून राज्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल."




कोणत्याही टिप्पण्या नाहीत