'मॉर्फोमाइंड २०२६'मध्ये 'हॉजकिन्स हायटेक्स'चा विजय; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी क्विझला उत्स्फूर्त प्रतिसाद
'मॉर्फोमाइंड २०२६'मध्ये 'हॉजकिन्स हायटेक्स'चा विजय; डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पॅथॉलॉजी क्विझला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव : डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या पॅथॉलॉजी विभागातर्फे आयोजित 'मॉर्फोमाइंड २०२६' या शैक्षणिक पॅथॉलॉजी क्विझ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. केतकी पाटील सभागृहात पार पडलेल्या या स्पर्धेत 'हॉजकिन्स हायटेक्स' संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. विद्यार्थ्यांमध्ये पॅथॉलॉजी विषयाविषयी सखोल ज्ञान निर्माण करणे, स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणे आणि वैद्यकीय शिक्षणातील गुणवत्ता वृद्धिंगत करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोलंकी, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. धनंजय बोरोले यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धेत कूलीज क्युरेटर्स, अस्कानाझी अॅनालिस्ट्स, काजल्स क्रॅकर्स, ऑस्लर्स ऑसम्स, कूम्ब्स कॉन्क्लेव्ह आणि हॉजकिन्स हायटेक्स या सहा संघांनी सहभाग घेतला. विविध ज्ञानाधारित आणि परस्परसंवादी फेऱ्यांनंतर अंतिम फेरीत हॉजकिन्स हायटेक्स संघाने बाजी मारली. अस्कानाझी अॅनालिस्ट्स संघ प्रथम उपविजेता, तर ऑस्लर्स ऑसम्स संघ द्वितीय उपविजेता ठरला. विजेत्या संघांना डॉ. धनंजय बोरोले यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दाखविलेली अभ्यासू वृत्ती, संघभावना आणि स्पर्धात्मक उत्साहाचे त्यांनी कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे विषयावरील ज्ञान अधिक दृढ होऊन वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्टतेची प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेशमा वानखेडे आणि डॉ. निकिता ठाकूर यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी पॅथॉलॉजी विभागाने प्राध्यापक, निवासी डॉक्टर, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानले. 'मॉर्फोमाइंड २०२६' ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, स्पर्धा आणि प्रेरणेचा अविस्मरणीय अनुभव ठरली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत