महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन; १६ जुलैला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्रात पावसाचे पुनरागमन; १६ जुलैला ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
मुंबई : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्यानंतर मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसह राज्यातील काही भागांत पुन्हा पावसाचे आगमन झाले आहे. १५ जुलै रोजी वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. मुसळधार पाऊस झाला नसला तरी वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १५ ते २१ जुलैदरम्यान कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यात मुसळधार पावसासाठी २० जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रासह देशाच्या सुमारे ७० टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब झाल्याचे उपग्रह छायाचित्रांमधून दिसून आले होते. मात्र, आता मान्सूनचे ढग पुन्हा परतले असून हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, गुरुवारी उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत