Contact Banner

नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून दुर्मीळ आजारावर यशस्वी उपचार; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया

 

tarunichya-nak-kanatun-vahanare-mendutil-pani-shastrakriyene-band

तरुणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

नाक-कान-घसा तज्ज्ञांकडून दुर्मीळ आजारावर यशस्वी उपचार; महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया

लेवाजगत न्यूज जळगाव : सतत डोकेदुखी तसेच नाक आणि कानातून पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येण्याच्या त्रासाने त्रस्त असलेल्या ३५ वर्षीय तरुणीवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील नाक-कान-घसा (ईएनटी) तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिला नवजीवन दिले. तपासणीनंतर तरुणीला ‘सीएसएफ ओटोरिया विथ रायनोरिया’ या दुर्मीळ आजाराचे निदान झाले. या आजारामुळे मेंदूभोवती असलेले सेरेब्रोस्पायनल फ्लुइड (सीएसएफ) नाक व कानातून गळत होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर द्रवस्त्राव पूर्णपणे थांबला असून तरुणीची प्रकृती आता उत्तम आहे.






संबंधित तरुणीला अनेक महिन्यांपासून सतत डोकेदुखी, नाकातून पाणी येणे तसेच कानातून द्रवस्त्राव होण्याचा त्रास होता. सुरुवातीला हा त्रास साधी सर्दी किंवा कानाचा संसर्ग असल्याचे समजून तिने विविध ठिकाणी उपचार घेतले. मात्र, अपेक्षित फायदा झाला नाही.

त्यानंतर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयातील नाक-कान-घसा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल यांनी आवश्यक तपासण्या केल्या. विशेष तपासण्यांमध्ये मेंदूभोवतीचे सीएसएफ नाक आणि कानामार्गे गळत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉ. अग्रवाल यांनी सीएसएफ ओटोरिया रिपेअर ही अत्यंत नाजूक व कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

शस्त्रक्रियेदरम्यान मेंदूतील पाणी गळती होणारे छिद्र शोधून विशेष तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ते कायमस्वरूपी बंद करण्यात आले. शस्त्रक्रिया यशस्वी ठरली असून तरुणीच्या नाक व कानातून होणारा द्रवस्त्राव पूर्णपणे थांबला आहे. तसेच सतत होणाऱ्या डोकेदुखीपासूनही तिची सुटका झाली आहे.

या शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंकज शर्मा, डॉ. शुभम सावकर आणि डॉ. अंकिता सोलंकी यांनी सहकार्य केले. विशेष म्हणजे ही संपूर्ण शस्त्रक्रिया महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली.


नाक किंवा कानातून सतत पाण्यासारखा पारदर्शक द्रव बाहेर येत असेल, विशेषतः डोक्याला दुखापत झाल्यानंतर किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना असा त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. हे मेंदूतील सीएसएफ गळतीचे लक्षण असू शकते. वेळेत निदान आणि योग्य शस्त्रक्रिया केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारास विलंब झाल्यास मेंदूला संसर्ग होण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
डॉ. अनुश्री अग्रवाल, विभागप्रमुख, नाक-कान-घसा विभाग, डॉ. उल्हास पाटील रुग्णालय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.