मृग बहार फळपिक विमा योजनेसाठी १४ जुलैपर्यंत अर्ज; शेतकऱ्यांनी मुदतीत लाभ घ्यावा
मृग बहार फळपिक विमा योजनेसाठी १४ जुलैपर्यंत अर्ज; शेतकऱ्यांनी मुदतीत लाभ घ्यावा
जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी-
प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना २०२६-२७ च्या मृग बहार हंगामासाठी जळगाव जिल्ह्यात लागू करण्यात आली असून, पात्र शेतकऱ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.
या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी चिकू, डाळिंब, पेरू, मोसंबी, लिंबू, सिताफळ, संत्रा या फळपिकांसह हळद या मसाला पिकाचाही समावेश करण्यात आला आहे. अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना बजाज जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार असून, हवामानातील प्रतिकूल बदलांमुळे होणाऱ्या उत्पादन नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
योजनेअंतर्गत कमी पाऊस, पावसाचा खंड, अतिवृष्टी, जास्त आर्द्रता, अवेळी पाऊस आणि वाढते तापमान यांसारख्या हवामान घटकांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी विमा संरक्षण उपलब्ध होणार आहे.
ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. अधिसूचित फळपिकांपैकी एका पिकासाठी एका वर्षात मृग किंवा अंबिया बहार या दोन हंगामांपैकी केवळ एका हंगामासाठीच विमा संरक्षणाचा लाभ घेता येणार आहे.
योजनेत सहभागी होऊ इच्छित नसलेल्या कर्जदार शेतकऱ्यांनी नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे. अन्यथा संबंधित शेतकरी योजनेत सहभागी असल्याचे गृहित धरून विमा हप्ता त्यांच्या कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल.
मृग बहार २०२६-२७ हंगामासाठी लिंबू, पेरू, मोसंबी, चिकू, डाळिंब, संत्रा आणि हळद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२६, तर सिताफळ पिकासाठी ३१ जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी व Agristack नोंदणी पूर्ण करून विहित मुदतीत विमा अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत