एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ४८ गावांतील शेतकरी महिलांना ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’चे मार्गदर्शन
एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकातील पाणी व्यवस्थापनाचे प्रशिक्षण; ४८ गावांतील शेतकरी महिलांना ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’चे मार्गदर्शन
जळगाव | लेवाजगत न्यूज : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर कापूस पिकामध्ये पाण्याचा कार्यक्षम व शाश्वत वापर करण्याच्या उद्देशाने प्रायमार्क कापूस प्रकल्पांतर्गत जळगाव येथील हॉटेल प्रेसिडेंटमध्ये ‘ट्रेनिंग ऑफ ट्रेनर’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रशिक्षणात सेवा फाउंडेशनच्या ४८ गावांतील शेतकरी महिलांना प्रशिक्षित करण्यात आले.
या प्रशिक्षणातून तयार झालेल्या महिला प्रशिक्षक पुढे आपल्या गावांतील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन, सिंचन नियोजन आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती तंत्रज्ञानाबाबत वैज्ञानिक मार्गदर्शन करणार आहेत. संभाव्य एल निनोमुळे निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईचा विचार करून कापूस पिकासाठी पाण्याचे नियोजन, बचत आणि कार्यक्षम वापर यावर विशेष भर देण्यात आला.
प्रशिक्षणात एक सरी आड सिंचन पद्धती, माती व वनस्पती निर्देशकांच्या आधारे सिंचनाचे योग्य वेळापत्रक निश्चित करणे, सूर्यफूलाच्या संकेतांद्वारे व पानांवरील सुकण्याच्या लक्षणांवरून सिंचनाची गरज ओळखणे, ठिबक सिंचनासोबत आच्छादन (मल्चिंग) तंत्राचा वापर करून पाण्याची बचत करणे तसेच अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे साठवण व जलसंधारणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील कृषी वनस्पतीशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक प्रा. निलेश भागवत सदार यांनी प्रमुख संसाधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर वैज्ञानिक पद्धतीने पाणी व्यवस्थापन केल्यास कापूस उत्पादन टिकवून ठेवणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास सेवा फाउंडेशनचे प्रतिनिधी, प्रशिक्षक तसेच विविध गावांतील शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रशिक्षणामुळे ग्रामीण भागात हवामान बदलाशी सुसंगत आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन शाश्वत कापूस उत्पादनाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत