लग्नानंतर सहाव्याच दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू; काका गंभीर जखमी
लग्नानंतर सहाव्याच दिवशी नवविवाहितेचा भीषण अपघातात मृत्यू; काका गंभीर जखमी
जळगाव | लेवा जगत न्यूज-
जळगाव शहरात सोमवारी (१३ जुलै) दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात लग्नाला अवघे सहा दिवस झालेल्या एका नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात तिच्यासोबत दुचाकीवर असलेले काका गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत महिलेचे नाव वैशाली भाऊसाहेब पाटील (वय २१, रा. कोळपिंप्री, ता. अमळनेर) असे आहे. तिचा विवाह ७ जुलै रोजी जळगावातील देवराम नगर परिसरातील रहिवासी व पोलीस कर्मचारी विजय काशिनाथ पाटील यांच्याशी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी वैशालीला माहेरी घेऊन जाण्यासाठी तिचे काका सासरी आले होते.
दुपारच्या सुमारास दोघे दुचाकीवरून कोळपिंप्रीकडे निघाले असता जळगाव विद्यापीठासमोरील रस्त्यावर मागून भरधाव वेगाने आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांनी वैशाली पाटील यांना मृत घोषित केले. जखमी काकांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली असून रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. धडक देणाऱ्या चारचाकी वाहनाचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत