पिंप्री बुद्रुक येथे गूढ घटनेत ३५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
पिंप्री बुद्रुक येथे गूढ घटनेत ३५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू
लेवाजगत न्यूज जळगाव : तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथे घरात स्वयंपाक करत असताना पाठीमागील कमरेच्या भागात अचानक वेदना जाणवून एका ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारासाठी जळगावला नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. मनीषा सुरेश पाटील असे मृत महिलेचे नाव आहे. अज्ञात प्राण्याच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मनीषा पाटील या नेहमीप्रमाणे घरात स्वयंपाक करत होत्या. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागील कमरेच्या भागात अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. “मला काहीतरी चावले आहे,” असे त्यांनी घरातील सदस्यांना सांगितले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जवळील खासगी डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी जळगावला हलविण्याचा सल्ला दिला.
त्यानुसार रिक्षातून जळगावकडे रवाना होत असताना पिंप्री गावापासून अवघ्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मनीषा पाटील यांची प्रकृती झपाट्याने खालावली. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. घोणस सर्पाच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांना पाचारण करून संपूर्ण घराची तपासणी करण्यात आली. मात्र, घरात कोणताही साप किंवा अन्य विषारी प्राणी आढळून आला नाही. त्यामुळे मनीषा पाटील यांना नेमक्या कोणत्या प्राण्याने चावा घेतला, याबाबतचे गूढ कायम आहे. वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मनीषा पाटील यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी तसेच सासू-सासरे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने पिंप्री बुद्रुक गावावर शोककळा पसरली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत