रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांना सावदा पोलिसांचा दणका; पायी पेट्रोलिंग करत फलक-लोटगाड्या हटवल्या
सावदा पोलिसांची धडक मोहीम; रस्त्यावर उभी वाहने हटवली, बेशिस्त वाहनधारकांना इशारा
लेवाजगत न्यूज सावदा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सावदा पोलिसांनी धडक मोहीम राबवत रस्त्यावर बेशिस्तपणे उभी करण्यात आलेली वाहने हटविली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता चौक ते शहरातील मुख्य बाजारपेठ या मार्गावर ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
शहरातील मुख्य मार्ग अरुंद असतानाच रस्त्याच्या कडेला, चौकांमध्ये तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने तासन्तास उभी केली जात असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे सातत्याने येत होत्या. या वाहनांमुळे नागरिकांसह रुग्णवाहिका, शालेय बस व इतर आपत्कालीन वाहनांना मोठा अडथळा निर्माण होत होता.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली. कारवाईदरम्यान वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने हटविण्यात आली. अनेक वाहनधारकांना समज देण्यात आली. तसेच दुकानदारांनी आपल्या ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहणार नाहीत, याची जबाबदारी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या.
या कारवाईमुळे बेशिस्त वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश पाटील, मयूर पाटील, निलेश बाविस्कर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
“यापुढे विनाकारण रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सातत्याने सुरू राहील,” असा स्पष्ट इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड यांनी दिला आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत