सावद्यात अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी कारवाई; वाहनासह दोन जनावरे ताब्यात
सावद्यात अवैध गोवंश वाहतूक प्रकरणी कारवाई; वाहनासह दोन जनावरे ताब्यात
लेवाजगत न्यूज | सावदा, ता. रावेर | प्रतिनिधी
सावदा शहरातील ख्वाजा नगर परिसरात अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सावदा पोलिसांनी कारवाई करत एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान वाहनातून दोन गोवंशीय जनावरे जिवंत अवस्थेत आढळून आली. पोलिसांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवून वाहनासह सुमारे १ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि. ३० जुलै) रोजी सकाळी सुमारे ६ वाजता ख्वाजा नगर परिसरातील वृंदावन मॉलजवळ संशयित वाहनातून गोवंशाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून संबंधित वाहन (एमएच ०२ वायए २६४४) अडवून तपासणी केली.
तपासणीदरम्यान वाहनात दोन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी जनावरांची अंदाजे किंमत ४० हजार रुपये, तर वाहनाची किंमत सुमारे १ लाख रुपये असल्याचे नमूद केले आहे. जप्त केलेली जनावरे पुढील काळजीसाठी गोशाळेत पाठविण्यात आली.
या प्रकरणी वाहन चालक शेख तनवीर शेख खलील (वय २७, रा. ख्वाजा नगर, सावदा, ता. रावेर) याच्याविरुद्ध सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तपासणीवेळी त्याच्याकडे संबंधित वाहतुकीसाठी आवश्यक कागदपत्रे, वाहनाचे काही दस्तऐवज तसेच वैध वाहनचालक परवाना उपलब्ध नव्हता.
या प्रकरणात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फड व त्यांच्या पथकाने केली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत