Contact Banner

सावदा येथे शिवसेना बैठकीत धुमश्चक्री; परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे

 

savda-bla-meeting-shiv-sena-cross-fir

सावदा येथे शिवसेना बैठकीत धुमश्चक्री; परस्परविरोधी तक्रारींवरून दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे







बि एल ए बैठकीत खुर्चीवरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत; नगरसेवक, नगरसेवक पतींसह दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांत गुन्हे दाखल

सावदा | प्रतिनिधी-

रावेर तालुक्यातील सावदा येथील शासकीय विश्रामगृहात शनिवारी (११ जुलै) आयोजित बीएलए (बूथस्तरीय कार्यकर्ते ) बैठकीदरम्यान खुर्चीवर बसण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे हिंसक रूप धारण झाले. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्याने सावदा शहरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोन्ही फिर्यादींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे.

पहिल्या प्रकरणात मोईनखान मोहसिनखान (रा. मदिना नगर, सावदा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बैठकीत झालेल्या वादानंतर भाजपा नगरसेवक सचिन चुडामन बन्हाटे,शिव सेना (शिंदे ) उपशहर प्रमुख,नगरसेवक पती मनीष यशवंत भंगाळे आणि गणेश राजू माळी यांनी संगनमताने मारहाण केली. फिर्यादीनुसार, सचिन बन्हाटे यांनी लोखंडी फावड्याच्या दांड्याने कपाळावर वार करून दुखापत केली, मनीष भंगाळे यांनी त्याच दांड्याने डाव्या हातावर मारहाण केली, तर गणेश माळी यांनी चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या तक्रारीवरून सावदा पोलिसांनी गुन्हा क्रमांक १७९/२०२६ दाखल करून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(३) व ३(५) अन्वये कारवाई सुरू केली आहे.

दरम्यान, याच घटनेप्रकरणी नगरसेविका पती मनीष यशवंत भंगाळे यांनीही सावदा पोलिस ठाण्यात स्वतंत्र फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, बैठकीदरम्यान खुर्चीवरून झालेल्या वादातून  मोईनखान मोहसिनखान यांनी शिवीगाळ करून कॉलर पकडत मारहाण केली तसेच वाहनाच्या चावीला असलेल्या धारदार वस्तूने डाव्या खांद्यावर व कानामागे वार केला. त्यानंतर बाहेर झालेल्या वादात शिवसेना, शहर प्रमुख तथा (शिंदे)नगरसेवक सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी यांनी लाकडी दांड्याने भाजपा नगरसेवक सचिन बन्हाटे यांच्या छातीवर मारहाण केली, तर मोईनखान यांनी धारदार वस्तूने त्यांच्या हातावर वार केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरूनही सावदा पोलिसांनी मोईनखान मोहसिनखान व सूरज उर्फ बद्री संतोष परदेशी यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण घटनेचा पुढील तपास सावदा पोलीस करीत असून, घटनास्थळी उपस्थित साक्षीदारांचे जबाब, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.