Contact Banner

समाजहितासाठी नवे पाऊल; मुंबई परिसरात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन

 

society-welfare-step-leva-patidar-mahasangh-counselling-and-grievance-center-inaugurated-mumbai

समाजहितासाठी नवे पाऊल; मुंबई परिसरात लेवा पाटीदार महासंघाच्या समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी खेमचंद्र पाटील -








महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाच्या मुंबई परिसर विभागाच्या वतीने समाजहिताचा महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन रविवारी (दि. २८ जून) ठाणे (पश्चिम) येथील एस. बी. फिरके विद्यालय, तीन हात नाका येथे उत्साहात पार पडले. महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात अरुण बोरोले यांनी समुपदेशन केंद्राची संकल्पना, उद्दिष्टे आणि समाजातील वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर अशा केंद्रांचे महत्त्व स्पष्ट केले. महासंघाचे हे चौथे समुपदेशन केंद्र असून प्रत्येक विभागात अशा प्रकारची केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. भविष्यात समाजाच्या गरजेनुसार या केंद्रांचे कार्यक्षेत्र आणि संख्या वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विकास वारके यांनी महासंघाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन करून त्यावरील विविध सुविधांची माहिती दिली. समाजबांधवांनी डिजिटल माध्यमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

के. जी. भोळे यांनी मुंबई परिसरातील समाजबांधवांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, कौटुंबिक आणि वैवाहिक समस्यांवर प्रकाश टाकत विवाहपूर्व व विवाहोत्तर समुपदेशनाचे महत्त्व अधोरेखित केले. व्यक्तीच्या जडणघडणीत कुटुंब, शिक्षण आणि समाज या तीन घटकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या क्षेत्रांतील समस्यांवर तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचे कार्य हे केंद्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

खान्देश सेना प्रमुख सुहासदादा बोंडे यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी कार्यकर्ता म्हणून संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. महासंघाचे ज्येष्ठ सल्लागार पुरुषोत्तम पिंपळे यांनी समुपदेशनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याची गरज व्यक्त केली.

महासंघाचे कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील यांनी समाजातील कौटुंबिक व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी समुपदेशनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. संकटग्रस्त समाजबांधवांना सामाजिक व आर्थिक आधार मिळावा, दातृत्वाची भावना वाढीस लागावी आणि समाजात एकात्मता टिकून राहावी, यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

दिव्यकांत नारखेडे यांनी समुपदेशन समितीची रचना, कार्यपद्धती आणि भविष्यातील नियोजन याविषयी माहिती दिली. त्यांनी कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालनही केले.

या कार्यक्रमाला उज्वल चौधरी, विकास भंगाळे, मेघश्याम चौधरी, वीणा चौधरी, विकास नेहेते, तन्वी सिंगनुरकर, राजेश ढाके, प्रकाश चौधरी, शैलेश बेंडाळे, दिलीप चौधरी, प्रा. डॉ. किरण चौधरी, लीलाताई गाजरे, राजेंद्र फालक, भूषण चौधरी, आशिष चौधरी, हेमंत चौधरी, मनीषा महाजन, दीपा वारके, चारुलता पाटील, रोहिणी सरोदे, एम. एच. कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच नितीन जावळे, स्मिता चौधरी, कामिनी जावळे, मुंबई परिसरातील लेवा पाटीदार समाज मंडळाचे पदाधिकारी, समाजबांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी निळकंठ चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले. समाजातील विविध समस्या संवाद, समुपदेशन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातून सोडविण्याच्या दृष्टीने या केंद्राची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.