बोधेगाव येथे अंजाळे-पंढरपूर पायी वारीचे स्वागत; संतांचा सत्कार, वारकऱ्यांना शुभेच्छा
बोधेगाव येथे अंजाळे-पंढरपूर पायी वारीचे स्वागत; संतांचा सत्कार, वारकऱ्यांना शुभेच्छा
बोधेगाव (फुलंब्री) प्रतिनिधी-
ह.भ.प. वै. जगन्नाथ महाराज अंजाळेकर यांच्या आशीर्वादाने यावल तालुक्यातील अंजाळे येथून पंढरपूरकडे निघालेल्या पायी वारीचे बोधेगाव (ता. फुलंब्री) येथे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी सावदा येथील श्रीकृष्ण मंदिराचे गादीपती आचार्य सुरेश शास्त्री मानेकर बाबा तसेच यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील दत्त मंदिराचे गादीपती महंत स्वरूपानंद महाराज यांनी पायी वारीला भेट देत वारकरी संप्रदायाप्रती आपला स्नेह आणि आदर व्यक्त केला.
या प्रसंगी ह.भ.प. धनराज महाराज, ह.भ.प. चिंतामण महाराज आणि ह.भ.प. सुभाष महाराज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. संत-महंतांच्या हस्ते झालेल्या या सन्मान सोहळ्यामुळे वारकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
आचार्य सुरेश शास्त्री मानेकर बाबा आणि महंत स्वरूपानंद महाराज यांनी सर्व वारकरी बांधवांना आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा देत, श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने सर्वांची वारी सुखरूप, मंगलमय आणि भक्तिमय पार पडो, अशी प्रार्थना केली. तसेच वारकरी संप्रदायातील भक्ती, समता, सेवा आणि सदाचाराचा संदेश समाजापर्यंत पोहोचवत ही परंपरा अधिक बळकट करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि टाळ-मृदुंगाच्या निनादात हा स्वागत सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. त्यानंतर पायी दिंडी पुढील प्रवासासाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत